Dnyakoshkar Shreedhar Venkatesh Ketkar Jayanti
ज्ञानकोशकार केतकर ( २ फेब्रुवारी १८८४ - १० एप्रिल १९३७)
====================================
सौजन्य :- श्री हेमंत केतकर ( पुणे )
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची जयंती, कमला नेहरू पार्क येथे सौ. माधुरी सहस्रबुद्धे आणि प्रा. श्याम भुर्के यांचे पुढाकाराने २ फेब्रुवारी १९ जयंती साजरी करून त्यांना वंदन करण्यात आले. केतकर कुळातील बरेच जण आवर्जून उपस्थित होते.
श्याम भुर्के यांनी केतकरांचा जीवनपट सुंदर उलगडला. तो खालीलप्रमाणे.
केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. त्यांचे पुढे वास्तव्य अमरावतीस होते व त्यांचे शिक्षण अमरावती, आणि विल्सन कॉलेज मुंबई येथे झाले. ते लहानपणापासूनच वाचनाचा छंद बाळगून होते. त्यांनी वाचनालयातील सर्व पुस्तके वाचून काढली. ते परीक्षार्थी अजिबात नव्हते. त्यांचा व्यासंग पाहून लोक चकित होत. पुढे त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांना गायकवाड राजे यांनी शिष्यवृत्ती दिली. ते १९०६ साली अमेरिकेला गेले तेथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन पी.एच.डी. मिळवली. तेथे त्यांनी भारतातील जाती व्यवस्थेवर ग्रंथ लिहिला. तो परदेशात खूप खपला आणि वाखाणला गेला. पुढे भारतात मात्र त्यास विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची राहणी विक्षिप्त होती. कपड्यांकडे त्यांचे लक्ष नसायचे. पुढे ते लंडनला आले. परदेश प्रवासात त्यांना इंडीथ व्हीकटोरीअन कोहेन नावाची सहाध्यायी भेटली होती.
त्यानंतर ते भारतात बोटीने परत आले, देशात मराठीत लोकांना समग्र ज्ञान मिळावे म्हणून त्यांनी मराठी ज्ञानकोश काढायचा ठरवले. त्यासाठी लोकमान्य टिळक यांचाही मोलाचा सल्ला त्यांना मिळाला.त्यासाठी त्यांनी प्रकाशन संस्था स्थापन करून प्रथमच एक नवीन कल्पना या प्रांतात आणली. ज्ञानकोशाचे महत्व लोकांना त्यांनी पटवून देऊन शेअर्स विकले आणि मराठीतला पहिला ज्ञानकोश प्रसिद्ध केला. त्यांच्या जातीव्यवस्थेत मुस्लिमांबद्दल लेखनामुळे या लोकांनी एक निषेध सभा आयोजित केली होती. केतकर त्या सभेत गेलेच नाहीत तर त्यांनी संयोजकांना देखील ज्ञानकोशाच्या प्रति विकल्या. पुढे कोहेन बाई ज्या ज्यू होत्या त्यांनी त्यांच्याशी विवाह करायचा प्रस्ताव ठेवला. लोकमान्यांनी त्यांना स्पष्ट केले की केतकर हे लेखक आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहील असे नाही. पण तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांचा केतकरांशी विवाह १९२० साली झाला व त्यांचे नाव शिलावती असे ठेवले गेले. अतिशय आर्थिक ओढाताणीत आणि विपन्न अवस्थेत देखील त्यांनी केतकरांना अखेपर्यंत मनोभावे साथ दिली.
केतकरांचे घर एरंडवणा येथे होते. त्या रस्त्याला आज ज्ञानकोशकार केतकरांचे नाव दिले आहे. पुण्यात रोगाची साथ आल्याने ते कॅम्प भागात राहिला गेले. पुणेकर त्यांना विसरले होते आणि एक दिवशी त्यांचे निधन झाले ही बातमी मिळताच पुणेकरांनी तिकडे धाव घेतली. केतकर अतिशय संवेदनशील होते. मृत्यू नंतर शव जाळण्याची प्रथा त्यांना शहारे आणणारी होती म्हणून त्यांनी आपल्याला पुरावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व हिंदू धार्मिक विधी करून त्यांना पुढे मुठा नदीच्या पात्रात पुरण्यात आले. काही काळाने पुरात ही शवपेटिका बाहेर निघाली मग ती मराठी साहित्य परिषदेत हलवली गेली. तिथे काही कुरबुर सुरु झाल्याने कमला नेहरू पार्क येथे त्यांची कायम समाधी बांधून शवपेटिका पुरण्यात आली. आज त्यांचे हे स्मृतिस्थान तेथे उभे आहे.
या स्थानाशेजारीच भुर्के सर यांनी केतकारांवर एक छान कविता लिहून ती ठळकपणे वाचता येईल अशी लावली आहे.
ज्ञानकोशकारांच्या कार्याला आणि स्मृतीला त्रिवार वंदन
==============================